एनआयएची छत्रपती संभाजीनगरातील हर्सूलमध्ये कारवाई; शहरात मोठ्या घातपाताचा कट, संशयित दहशतवाद्याला बेड्या

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दहशतवादी संघटना इसिसच्या संपर्कात राहून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी मोठी घातपाती कारवाई करण्याचा कट रचणाऱ्या संशयित दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, गुन्ह्यासंबंधीत कागदपत्र जप्त केले. छत्रपती संभाजीनगरातील हर्सूलमधील बेरीबाग परिसरात गुरुवारी (दि. १५) ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शहरातील इसिस कनेक्शन पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आले आहे. मोहंमद झोएब खान (४०, रा. बेरीबाग, हर्सूल) असे एनआयएने अटक केलेल्या संशयित दहशतवाद्याचे नाव आहे. तो वेब डिझाईनर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
अधिक माहितीनुसार, एनआयएने नऊ ठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर झोएबला अटक केली. झोएब काही महिन्यांपासून आॅनलाइन पद्धतीने इसिसच्या संपर्कात होता. ही बाब एनआयएच्याही लक्षात आली होती. तेव्हापासून एनआयएचे झोएबवर बारीक लक्ष होते. याची एकाही स्थानिक यंत्रणेला माहिती नव्हती. दहशतवाद विरोधी पथकालाही ही खबर नव्हती. दरम्यान, तो मागील काही दिवसांपासून अधिक सक्रिय झाला होता. त्याने स्थानिकला नेटवर्क तयार करण्याचेही काम हाती घेतले होते. तसेच, तो भारतात मोठा घातपात करण्याच्या तयारीला लागला होता. त्यापूर्वीच एनआयएने त्याच्या घरात छापा मारला. या तपासणीत काही महत्त्वाची कागदपत्रे व लॅपटॉप व इतर साहित्यही पथकाने जप्त केले आहे. या प्रकरणात एनआयएने मुंबईत गुन्हा दाखल केला आहे, असे एनआयएने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

इसिस खलिफाची प्रतिज्ञा

आरोपी झोएब खान आणि त्याच्या साथीदारांनी इसिस खलिफाची प्रतिज्ञा (बायथ) घेतली होती. झोएब हा समाजातील तरुणांना इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करत होते. त्यासाठी तो सोशल मीडियावर हिंसक व अत्याचाराच्या घटनांचे व्हिडिओ आणि संदेश व्हायरल करत होता. समाजातील कंटरपंथीय तरुणांचा शोध घेऊन त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये व इसिस संघटनेत सहभागी करून घेण्याचेही काम तो करत होता, असे एनआयएच्या सूत्रांनी सांगितले.

सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह

एनआयएच्या तपासानुसार, झोएब आणि त्याचे साथीदार हे भारत आणि परदेशात जागतिक दहशतवादी नेटवर्कच्या कारवाया पुढे नेण्यासाठी त्यांच्या विदेशी हँडलर्सच्या सतत संपर्कात होते. ते सीरियाला हिंसक जिहाद आणि हिज्राशी संबंधित सामग्रीसह प्रतिज्ञाचे व्हिडिओ शेअर करत होते. दहशतवादविरोधी एजन्सीने या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला आहे. झोएबच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.

The post एनआयएची छत्रपती संभाजीनगरातील हर्सूलमध्ये कारवाई; शहरात मोठ्या घातपाताचा कट, संशयित दहशतवाद्याला बेड्या appeared first on पुढारी.



from पुढारी https://ift.tt/CsA1Wm0
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url